हिंगोली Hingoli Earthquake :हिंगोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 05ः09 वाजता भूकंप झाला. जेव्हा भूंकप झाला तेव्हा बरेच लोक झोपले होते. ज्यांना जाग आली त्यांनी आपल्या प्रियजनांना जागं केलं आणि घराबाहेर पळ काढला. भूकंपानंतर काही वेळानं दुसरे धक्के बसले, त्यानंतर लोक घाबरले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं सांगितलं की, रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी नोंदवली गेली. सुदैवानं यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
जमिनीखाली केंद्रबिंदू : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार हा भूकंप पहाटे 05:09 वाजता झाला आणि त्याचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5 किलोमीटर खाली होता. त्यामुळं कोणतंही नुकसान झालं नाही. महाराष्ट्राव्यतिरिक्त तेलंगणा आणि कर्नाटकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचं केंद्र तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून 255 किलोमीटर आणि नागपूरपासून 265 किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगण्यात येतय.
अरबी समुद्रात धोकादायक भूकंप : हिंगोलीपूर्वी 19 नोव्हेंबरच्या संध्याकाळी अरबी समुद्रातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी संध्याकाळी 6.36 वाजता अरबी समुद्रात झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी मोजली गेली. तसंच रविवारी नेपाळ आणि जम्मू-काश्मीरमधील डोडा इथंही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये रविवारी दुपारी 3.45 वाजता 3.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि रविवारी सकाळी 11.30 वाजता जम्मू-काश्मीरच्या डोडा इथं 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.