हिंगोली -जगभरात हाहाकार केलेल्या कोरोनाला हरवण्यासाठी यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लस अत्यंत सुरक्षित असून १ मे पासून जिल्ह्यात सुरु होणाऱ्या सर्वसमावेशक लसीकरणासाठी ११ हजार २०० लस उपलब्ध करून दिल्या आहेत. या लसीकरणाचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यामध्ये लसींचा तुडवडा असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने, खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत याबाबतचा आढावा घेतला.
हिंगोली जिल्ह्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त यांना निर्देश दिले होते. तत्काळ १० हजार कोविशील्ड आणि १२०० कोवॅक्सिन असे एकूण ११ हजार २०० लस उपलब्ध करून दिल्या आहेत.