हिंगोली -हिंगोली येथील नगर पालिकेने नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांत सहभागी होऊन शहराचा कायापालट करणारी आणि नागरिकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी नगरपालिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता याच नगर पालिकेने राज्य शासनाच्या 'माझी वसुंधरा' अभियानात सहभागी होत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे, हिंगोलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. या पुरस्काराचे आज ऑनलाइन वितरण करण्यात आले.
हेही वाचा -धक्कादायक : कोरोना वार्ड परिसरात राबताहेत अल्पवयीन मुले; कालच झाला फडणवीसांचा दौरा
राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून माझी वसुंधरा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने राज्यातील 222 नगरपालिकांपैकी एक असलेल्या हिंगोली नगरपालिकेने देखील यामध्ये सहभाग नोंदविला होता. या अभियानात पृथ्वी, जल, वायू हे घटक ठेवण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील नगरपालिकांनी अभियानात ठेवण्यात आलेल्या घटकावर काम करून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आवाहन केले होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह नगरसेवक, पालिकेचे अभियंता रत्नाकर आडशिरे, अभियंता स्नोबर तमसीन, श्याम माळवटकर, बाळू बांगर, पंडित मस्के, विनय साहू यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. हिंगोली शहरात नागरिकांच्या मदतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते, तर याला नागरिकांनी देखील प्रतिसाद दर्शविली होता.