हिंगोली -लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी महिनाभरापासून राजकीय प्रचाराची सुरू असलेली धाम धूम मंगळवारी थांबली. लोकसभेसाठी ६ विधानसभा मतदारसंघात एकुण १ हजार ९९७ मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पैकी २६ मतदान केंद्र संवेदनशील असल्याने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढिलेला आहे. या निवडणुकीत ६ ही विधानसभा मतदार संघात १७ लाख ३२ हजार ५३४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी ५ हजार ६९२ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांगासाठी ४८५ व्हील चेअर उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
हिंगोली लोकसभेसाठी १८ एप्रिलला पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात शेवटचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच मतदान पेट्या सुपूर्त करून मतदान केंद्रावर रवाना केले जाणार आहे. सहाही लोकसभा मतदार संघात एकूण सात सखी मतदान केंद्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यंदा प्रथमच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण केलेली आहे. त्या सखी मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिलाच असणार आहेत. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्रांची सुरक्षितता लक्षात घेण्यात आलेली आहे. संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर वेब कास्टिंग, मायक्रा ऑब्झर्वर, तसेच केंद्रीय सुरक्षा बल यापैकी एक किंवा जास्त यंत्रणांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर मतदान केंद्रावर ८ हजार ८८९ मतदान कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. तर मतदानाच्या दिवशी ५३९ वाहने लागणार असून, सर्वच वाहनावर जीपीएस यंत्रणा लावलेली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान केंद्रावर मतदाराने मोबाइल आणू नये आणल्यास मोबाईल सांभाळण्याची जबाबदारी मोबाईल धारकांची राहणार आहे, सहाही मतदारसंघातील २०२ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. यासाठी १०० मायक्रो ऑब्झव्हर ३०० हून अधिक जास्त मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करून ऑब्झर्वर ला अहवाल देणार आहेत.