हिंगोली- जिल्ह्यात निवड केलेल्या प्रकल्पातील शेतकऱ्यांना कृषि विभागाकडून वेळीच बियाणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरवर्षी खरीपाच्या पेरणीवेळी कृषी विभागाकडून उशिरा बियाणांचा पुरवठा होतो. त्यामुळे यावेळी लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर साहित्य उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कमी उत्पादन झालेल्या प्रकल्पातील गावांची निवड करून त्या मंडळातील शेतकऱ्यांना महामंडळाकडून प्राप्त झालेले बी बियाणे शेतकऱ्यांच्या सातबारानुसार वाटप केले जाते. मात्र, कधी कृषी विभागाला उशिराने बियाणे प्राप्त झाल्याने तर कधी नियोजनाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना बियाणे वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी येतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटात महामंडळाने कृषी विभागाला सोयाबीन, तूर, मूग, उडीदाचे बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. हे बियाणे केवळ सेनगाव आणि हिंगोली या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोविंद बेनटेवाड यांनी दिली. हिंगोली व सेनगाव तालुक्यातील निवड केलेल्या प्रकल्पात हे बियाणे वाटप केले जात आहे.