हिंगोली - जिल्हाभरात गेल्या तीन ते चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. दोन दिवसात तर पावसाचा एवढा हाहाकार वाढलाय. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहु लागले आहेत. यामध्ये जिल्ह्यात गुर तसेच ग्रामस्थ वाहून जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तर अनेक ठिकाणी रस्त्यावरील पाणी ओसरण्यासाठी प्रवाशांना रात्रभर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. नरसी पोलीस ठाणे हद्दीतून वाहून गेलेला मृतदेह हिंगोली शहरापासून काही अंतरावर आढळला आहे. सदरील मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
कयाधू नदी परिसरात एकाचा आढळला मृतदेह -
हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रात विभागानुसार कोण कोणत्या तारखेला पाऊस पडणार? किती पडणार, याचा संपूर्ण अंदाज सांगितला होता. उत्तर महाराष्ट्रात ७, ८ आणि ९ तारखेला मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यांचा हा अंदाज खरा ठरला असून, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याबरोबरच हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसातून तर एवढा पाऊस होतोय, त्यामुळे नदी नाले तलाव, धरणे फुल झाली आहेत. दोन दिवसापुर्वी कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी येथे गावाजवळून वाहत असलेल्या ओढ्यात एक सहा वर्षीय चिमुकली वाहून गेली, तर त्याच दिवशी सेनगाव तालुक्यातील गांगलवाडी परिसरातून वाहनाऱ्या नदीतूनही एक जन वाहून गेला. तसेच बन बरडा येथील उद्धव काळे हे देखील पूर्णा नदीत वाहून गेले होते. आज सायंकाळच्या सुमारास हिंगोली शहराच्या टोकावरुन वाहणाऱ्या कयाधू नदी परिसरात एकाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाली असून, म़तदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.