हिंगोली - कमला नगर भागात राहणाऱ्या एका 21 वर्षीय जावयाचा सासऱ्यानेच खून करून त्याला विहिरीत फेकून दिल्याची घटना 23 दिवसांपूर्वी घडली होती. आता त्याच्या पत्नीचा मृतदेह देऊळगाव भागात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. निकिता मधुकर लोणकर असे 20 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वी नवऱ्याचा खून
नात्यात असलेल्या शिंदेंफळ येथील वैभव जयचंद वाठोरे याच्याशी निकिताने 17 जून 2019 रोजी प्रेम विवाह केला होता. याच प्रेम प्रकरणातून वैभववर गुन्हाही दाखल झाला होता. सासरे आणि जावई यांच्यात नेहमीच वाद होत होते. तर सासऱ्याने वाळूचे ट्रॅक्टर पकडण्याचा बहाणा करून वैभवला सोबत नेऊन त्याचा 30 नोव्हेंबर रोजी खून करून विहिरीत फेकले होते. 2 नोव्हेंबर रोजी नरसी पोलीस ठाण्यात येत असलेल्या चांगेफळं शिवारातील शेतातील विहिरीत वैभवचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी नरसी पोलीस ठाण्यात सासऱ्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.