हिंगोली - दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत चालला आहे. यांसारख्या वाढत्या घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकू लागली आहे. मात्र, आता एका वैज्ञानिक तरुणीने बनवलेले यंत्र हे तरुणीची छेडछाडीपासून बचाव करणार आहे. पूजा चव्हाण असे या वैज्ञानिक विद्यार्थिनीचे नाव आहे. कोणत्याही महिला किंवा तरुणीची छेडछाड करणाऱ्याला जोराचा विजेचा धक्का बसणार आहे. या यंत्राच्या सहाय्याने तरुणींची छेडछाडी पासून तरुणींची सुटका होण्यास मदत होणार आहे.
पुजा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील आजूबाई विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने हिंगोली येथील साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात हा प्रयोग सादर केला होता. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात पाच तालुक्यातून 141 प्रयोग बालवैज्ञानिक सादर केले होते. त्यापैकी काही प्रयोग हे खरोखर आकर्षक होते. त्यापैकी पूजाने केलेला हा महिला संरक्षणचा प्रयोग मात्र लक्षवेधी ठरला. आज महिलांचे रक्षण करण्यासाठी अशा काही तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो, हे पूजाने प्रयोगातून दाखवून दिले आहे.
हेही वाचा - जगासमोर आदर्श ठेवणारी जिल्हा परिषदेची 'झिरो एनर्जी शाळा'
आजही शाळा, महाविद्यालये, परिसर किंवा प्रवास करताना शक्यतो विद्यार्थिनी, स्त्री, तरुणी एकट्या असतात. त्यासाठी हे तंत्रज्ञान आपली कामगिरी बजावून महिलांचा बचाव करू शकते. एवढेच नव्हे तर बँकेतून पैसे काढल्यानंतर किंवा भरण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीवरही चोरटे हल्ला करून रक्कम पळविण्याचा प्रयत्न करीत असतात. यावेळी सुद्धा हे यंत्र उपयुक्त ठरू शकते. तर हा प्रयोग खरोखरच अंमलात आणल्यास युवतीची छेड थांबण्यास मदत होईल, असे मत पूजाने व्यक्त केले आहे.