हिंगोली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. यात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न संपूर्ण देशातून केला जात आहे. जिल्ह्यातील मेथा येथील ग्रामस्थांनी शिवजयंतीसाठी जमा झालेला ४ हजार २०० रुपयांचा निधी पीडित कुटुंबीयांच्या जवानांना देण्याचा निर्णय घेतला. दर वर्षी मोठ्या उत्साहात होणारी शिवजयंती यंदा अतिशय शांततेने साजरी करण्यात आली.
शिवजयंतीच्या खर्चाला फाटा, जमा निधीतून वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत - पुलवामा दहशतवादी हल्ला
जिल्ह्यातील मेथा येथील ग्रामस्थांनी शिवजयंतीसाठी जमा झालेला ४ हजार २०० रुपयांचा निधी पीडित कुटुंबीयांच्या जवानांना देण्याचा निर्णय घेतला.
पुलवामा येथील घटनेने संपूर्ण देश दुःखात आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे कार्यक्रम घेणे टाळले जात असून, सर्वप्रथम वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. तर बहुतांश लग्नसमारंभात देखील जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पुढील कार्यास सुरुवात केली जात आहे. तर जवानांच्या कुटुंबाला फुल नाही फुलांची पाकळी म्हणून अनेकांकडून मदत केली जात. याच प्रकारची काही मदत ग्रामीण भागातील युवकांकडून देण्यात आली.
एकीकडे सर्वसामान्यांकडून मदत केली जात असताना शासकीय विभागाकडून मदत केल्याचे ऐकण्यात आले नाही. मात्र, या ग्रामस्थांकडून घेतलेला निर्णय खरोखरच आदर्श ठरला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन जवानांच्या प्रत्येकी खात्यावर २ हजार १०० असा ४ हजार २०० रुपयांचा निधी टाकण्यात आला.