काही नाही, या सरकारला जनतेला मारायचंय; पेट्रोल दरवाढीनंतर हिंगोलीत संतप्त प्रतिक्रिया - hingoli news
सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून दर कमी करावेत, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हिंगोली - 'काही नाही, या सरकारला जनतेला मारायचंय, म्हणूनच कोणत्याही वस्तूची महाग करतंय, त्यातच पेट्रोल दरवाढ अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच लागू झाल्यामुळे, हे सरकार म्हणजे खरोखरच जनतेचे कंबरडे मोडणारे सरकार आहे', अशी तिखट प्रतिक्रिया पहाटे-पहाटे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनी दिली. अजून काय-काय पहावे लागणार या सरकारच्या काळात हेदेखील सांगता येत नसल्याचे वाहनधारक म्हणत होते. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी इंधनाचे दर वाढल्याने हिंगोलीतील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोल दरवाढ लागू केली. त्यामुळे ही जनतेची केवळ 'हऱ्याशमेन्ट' आहे. तुम्हाला पेट्रोलची दरवाढ करायचीच होती, तर जनतेतून तुम्ही प्रतिक्रियाही घेऊ शकला असता. आता पेट्रोल दरवाढ केली म्हणजे तुम्ही इतरही वस्तूच्या किंमती वाढवणार! हेही निश्चित आहे. त्यामुळे आम्हाला या सरकारकडून खूप मोठी अपेक्षा होती. मात्र, काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आणि त्याचे परिणाम दुसऱ्या दिवशी जाणवू लागल्यामुळे या सरकारवरील विश्वास पहिल्याच अर्थसंकल्पामुळे उडण्याची वेळ आली आहे. आज पेट्रोल-डिझेलची भाववाढ लागू केल्याने हे मात्र स्पष्ट झाले की, हे सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे नव्हे, तर उद्योजकांच्याच हिताचे आहे. आज जनता कशी हाल भोगते आणि त्यात भर म्हणून सरकार प्रत्येक वस्तूच्या किमती वाढवते, याला काही अर्थ आहे का?. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हे सरकार खूप वेळ घेते, मात्र कोणत्या वस्तूवर भाववाढ लागू करण्यासाठी रात्रही उलटू देत नाही.