हिंगोली- शहरातील भाजी मंडई भागात हिंगोली नगरपालिकेच्यावतीने, दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. दरम्यान, आज (दि. 8 ऑक्टोबर) अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत फळ विक्रेत्यांनी वाद घातला. एवढ्यावर न थांबता विक्रेत्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 12 फळविक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली शहरामध्ये नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार आज नगरपालिकेचे कर्मचारी अभियंता गजानन हिरेमठ, विजय शिखरे यांचे पथक भाजी मंडई भागात अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. त्यांनी अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करताच तेथील फळ विक्रेत्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याच गोंधळात फळ विक्रेत्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली.