हिंगोली - जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील विविध भागात अडकून पडलेल्या 125 परप्रांतीय मजुरांना प्रशासनाच्या पुढाकाराने मंगळवारी लालपरीने स्वगृही पोहचवण्यात आले. या मजुरांना स्वगृही पाठविण्यासाठी आमदार राजू नवघरे यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याने, मजुरांनी प्रशासनासह आमदारांचे आभार मानले.
हिंगोलीत 40 दिवसानंतर पहिल्यांदाच धावली 'लालपरी', 125 मजुरांना स्वगृही पोहचवले - migrant workers in hingoli
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, तब्बल ४० दिवसानंतर परप्रांतीय मजुरांना स्वगृही सोडण्याकरता मंगळवारी प्रशासनामार्फत एसटी बस धावली. यावेळी वसमत तालुक्यातील विविध भागात अडकून पडलेल्या 125 मजुरांना मध्य प्रदेशची सीमा असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कडकी येथील चेक पॉईंटवर सोडण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांनाच फटका बसला आहे. त्यात कामकाजही बंद झाल्याने, वसमत तालुक्यातील विविध भागात हातावर पोट घेऊन असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. यावेळी अनेक दानशुरानी पुढे येत या मजुरांना मदत करून, त्यांची जेवणाची व्यवस्था केली. मात्र, मजूर स्वगृही जाण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे त्यांना स्वगृही पोहोचवण्यासाठी आमदार राजू नवघरे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले असून मंगळवारी 125 मजुरांना मध्य प्रदेशची सीमा असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कडकी येथील चेक पॉईंटवर सोडण्यात आले.
या मजुरांना सोडण्यासाठी यादी दिल्यानंतर तत्काळ दखल घेत आगारप्रमुख मुपडे यांनी 5 विशेष बस उपलब्ध करून दिल्या. तसेच प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून व त्यांना मास्क, सॅनिटायझर देत वसमत येथून रवाना केले. तर, तहसीलदार ज्योती पवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी, नायब तहसीलदार जैस्वाल, सीओ अशोक साबळे आदींची उपस्थिती होती. बसस्थांनकातून बस निघाल्यानंतर सर्व प्रवाशांनी प्रशासनासह उपस्थितांचे आभार मानले.