महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीः सेनगाव कार अपघात, पुलाच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारावर अखेर गुन्हा दाखल

हिंगोलीत ठेकेदाराने अर्धवट काम ठेवलेल्या पुलावर कारचा अपघात झाला. यात चौघांचा मृत्यू झाला आहे. आता संबंधित ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ठेकेदाराने या पुलाचे काम सुरू असल्याच्या सुचना देणारे कोणतेही फलक लावले नव्हते. त्यामुळे आता त्याचा धाबे दणाणले आहेत.

hingoli
हिंगोली

By

Published : Jun 14, 2021, 8:29 PM IST

हिंगोली - रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सेनगाव ते येलदरी रस्त्यावरील अर्धवट पुलाच्या बांधकामात कार कोसळून 4 जणांचा पाण्यात गुदमरून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात संबंधित ठेकेदारावर सेनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

मृतांची नावे -

प्रकाश साहेबराव सोनवणे (४३ वर्षे, रा. वढव ता लोणार), गजानन अंकुश सानप (४६ वर्षे, रा.खळेगाव ता. लोणार), त्र्यंबक संजाबराव थोरवे (४० वर्षे, रा. पळसखेडा, ता. लोणार) आणि विजय परसराम ठाकरे (४७ वर्षे, रा. धानोरा जि. बुलढाणा) अशी मृतांची नावे आहेत.

कारमध्ये पाण्यात गुदमरून चौघांचा मृत्यू -

हे सर्वजण एम. एच. २८ ए. झेड ११२० या कारमधून सेनगाव ते येलदरी राज्य महामार्गावरून जात होते. दरम्यान सेनगावपासून काही अंतरावर असलेल्या अर्धवट पुलाजवळ संबंधित ठेकेदाराने कोणतेही दिशादर्शक फलक लावले नव्हते. तसेच या ठिकाणी काढण्यात आलेला पर्यायी रस्तादेखील अरुंद आहे. त्यामुळे रस्ता वाहन चालकाच्या लक्षात आला नाही. त्यामुळे त्याने थेट कार पुलावर नेली. परिणामी अर्धवट काम झालेल्या पुलावरून ही कार पाण्यामध्ये कोसळली. त्यामुळे चारही जणांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला.

ठेकेदारावर गुन्हा दाखल -

या घटनेची बातमी सोशल मीडिया व्हायरल झाली. त्याची दखल घेत पोलीस प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर एकनाथ ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या तक्रारीवरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

गुत्तेदाराला निष्काळजीपणा भोवला -

संबंधित ठेकेदाराने सेनगाव ते येलदरी या महामार्गावरील पुलाचे बांधकाम करत असताना रस्त्याच्या बाजूला कोणताही दिशादर्शक फलक लावलेला नव्हता. तसेच कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाहीत. सावधानीचे बोर्ड यासह कोणतेही इंडिकेटर लावण्यात आलेले नाहीत. शिवाय पुलापासून काढून दिलेला रस्तादेखील अरुंद असल्याने या अपघातास गुत्तेदाराला जबाबदार धरण्यात आले आहे. मात्र, या कारवाईने रस्त्याचे वा पुलाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या गुत्तेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा -कोरोनाने हवालदिल चालक पोलिसांच्या हफ्ता वसुलीने हैराण, व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details