हिंगोली - कापसाच्या लागवडीबरोबरच गांजाची शेती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारात आढळून आला आहे. या शिवारात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएएस) टाकलेल्या छाप्यात गांजाच्या शेतीचा पर्दाफाश झाला आहे. एटीएसने जवळपास दोन ते अडीच लाख रुपये किमतीची झाडे जप्त केली आहेत. तर, चार शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
धक्कादायक! कापसाच्या शेतात गांजाची शेती; दहशतवादविरोधी पथकाकडून पर्दाफाश - हिंगोलीत एटीएस कारवाई
कापसाच्या शेतात गांजाची लागवड झाल्याचे आढळल्याने हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर औंढा नागनाथ तालुक्याच्या आणखी शेतशिवारात गांजाची शेती असल्याचा एटीएएसला संशय आहे.
नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारात शेतामध्ये गांजाची शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने या भागातील शेतशिवारात जाऊन पाहणी केली. त्या शेतात कापसाच्या शेतात गांजाची झाडे आढळली. एटीएएस पथकाने परिसरातील सर्वच शेती पिंजून काढली. यावेळी एटीएसने सुमारे ३० ते ४० किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत. तर, ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची एटीएएस चौकशी करत आहे. या भागात अजूनही गांजाची शेती आहे का ? याची तपासणी केली जात असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी सांगितले.
दुसरीकडे, हट्टा पोलीस ठाणे हद्दीत अनेक ठिकाणी गांजाची झाडे आढळली आहेत. या संपूर्ण प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या भागातील अनेक शेतकरी गांजाची शेती करत असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलीस शेतशिवार अजून पिंजून काढत आहेत. गांजा शेतीचा पर्दाफाश करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्वर वैंजने व सहायक पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर यांच्या पथकाने केली आहे.