हिंगोली -दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने हिंगोलीकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज(बुधवार) 45 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. दरम्यान, यातील काही जणांना आदल्या दिवशी नवीन गाईडलाईननुसार सुट्टी देण्यात आलेली होती. त्यामुळे, त्या-त्या गावामध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. निगेटिव्ह रिपोर्ट दिसेपर्यंत काही ग्रामपंचायतीने हे रुग्ण गावात घेण्यासाठी विरोध देखील केला होता. तर, जिल्ह्यात 183 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 151 रुग्ण हे बरे झाले आहेत.
हिंगोली येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 29 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना बरे झाल्यानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात खंडाळा 9, खांबाळा 1, माळसेलु 1, इंचा 3, वडद 1, भिरडा 1, बासंबा 1, लिंबाळा 1, पेन्शनपुरा 1, बागवानपूरा 4, आनंद नगर 1, सिद्धार्थ नगर 5 तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील देवळा येथील 1, पहेनी 2, सुरजखेडा 1 अशा चार जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. एवढेच नव्हे तर सेनगाव येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या खुडज येथील 9 आणि बरडा येथील 3 अशा बारा जणांना देखील डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजघडीला हिंगोली जिल्ह्यातील विविध कोरोना केंद्रामध्ये केवळ 32 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.