हिंगोली - देशातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या, औंढा नागनाथ येथील नागनाथाची इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना पूजा करण्यात आली आहे. एरव्ही श्रावण महिन्यात मंदिर परिसरात भाविकांच्या मध्यरात्रीपासून रांगा लागतात. यंदा मात्र सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असून देशात ठिकठिकाणी मंदिरात पूजा करण्यात येत आहे. देशातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या, औंढा नागनाथ येथेही नागनाथाची पूजा करण्यात येत आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना ही पूजा करण्यात आली. संस्थांनचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी सपत्निक व पुजारी यांनी नागनाथची शासकीय पूजा केली. एरव्ही श्रावण महिन्यामध्ये या मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी असते. शिवाय अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात राहतो. यंदा मात्र सर्वत्र शुकशुकाट आहे. भाविक रात्रीपासूनच दर्शन घेण्यासाठी रांगा लावतात. रांगेमध्ये सर्वात समोर असलेल्या भाविकांना शासकीय पूजेत बसण्याची संधी दिली जाते. मात्र यावर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे सर्व परिस्थिती बदलली आहे.