पुणे - जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कुसुम डिस्टिलेशन अँड रिफायनरी या कंपनीत आज २२ मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. या आगीचे दूरवरून लोट दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बऱ्याच वेळानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत भीषण आग कुरकुंभ येथील कुसुम डिसटिलेशन अँड रिफायनरी या कंपनीत आग लागल्यानंतर केमिकल्सने भरलेले बॅरेल १०-१० मिनिटाला फुटून त्याच्या आवाजाने परिसर दणाणत होते. तसेच हवेत आगीचे भयानक लोळ आणि काळा काळा धूर पसरत होता. आगीचे लोळ आणि धूर दहा ते पंधरा किलोमीटरवरून दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तर आगीचे भयानक स्वरूप पाहता परिसरातच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत भीषण आग कुरकुंभ औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली ते समजू शकले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. तसेच कोणी जखमीही झाले नाही. दरम्यान, याठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी भेट देऊन पाहणी केली.
यापूर्वी देखील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांममध्ये आग लागणे, रसायनांचे स्फोट होण्याचे गंभीर प्रकार घडले होते. आजवर येथील अनेक कंपन्यांमध्ये अशा घटना घडल्याने येथील कंपन्या धोकादायक असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.