हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन खूप सतर्क झालेले आहे. पुणे येथून आलेल्या तरुणाने खबरदारी घेत स्वतःहून डॉक्टरकडे जाऊन पूर्णपणे तपासणी करून घेतली. असे असतानाही गावातील पोलीस पाटलाच्या पतिने सदरील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची खोटी अफवा पसरवली. तसेच त्याच्या घरी असलेल्या दुकानावर न जाण्यासह त्याला कोणी न बोलण्याचेही सांगत फिरत सुटला होता. त्यामुळे तरुणांच्या फिर्यादी वरून सेनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार पटलीनबाईच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, ग्रामस्थांची अशी वागणूक पाहून अनेकांना पश्चाताप होत आहे.
सेनगाव तालुक्यातील कवठा येथे हा प्रकार घडला आहे. येथील अनेक कुटुंब कामानिमित्त पुणे येथे स्थलांतरित झाले आहेत. सध्या देशात कोरोनाची साथ सुरू असल्याने सर्वच कामे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे येथे स्थलांतरित झालेली अनेक कुटुंब गावाकडे परतत आहेत. असाच एक तरुण पुण्यावरून गावामध्ये आला. या तरुणाने खबरदारी म्हणून, नियमाप्रमाणे कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व जिल्हासामान्य रुग्णलाय जाऊन स्वतःची कोरोनाबाबतची आरोग्य तपासणी केली. मात्र, गावात पोलीस पाटील असलेल्या महिलेच्या पतीने त्या तरुणांना कोरोना झाल्याची खोटी अफवा गावामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवली.