महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर जबरदस्ती विवाह लावून देण्याचा प्रयत्न फसला; ८ दिवसांनंतर गुन्हा दाखल

प्रत्येकवेळी वेगवेगळ्या प्रकारचे कारणे देऊन, कागदपत्रे हिंगोली येथे असल्याचे सांगून पीडितेला कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने हिंगोली येथे आणले अन् एका घरामध्ये डांबून ठेवत तिच्या एक वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत, आम्ही सांगू त्या व्यक्तीसोबत तू लग्न कर, असा तगादा लावला होता.

By

Published : Apr 19, 2020, 5:09 PM IST

हिंगोली- महिलेला एका खोलीत डांबून ठेवत तिच्या एक वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्ती विवाह लावून देण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तब्बल आठ दिवस उशिराने गुन्हा दाखल झाला आहे. त्यातच स्वतः गुन्हा दाखल करून घेतलेल्या पोलीस निरीक्षकाला तर गुन्हा दाखल झाला की नाही, याची साधी पुसटशी कल्पनादेखील नाही.

रेखा भोपाळे, बंडू देवडे, चोवितरा उर्फ राधा माणिकराव अवचार अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पीडित महिलेला 10 एप्रिल रोजी बचत गटाचे काम करतो असे म्हणून तिच्याकडून मूळ कागदपत्रे घेतली. मात्र बचत गटाचे काम न झाल्याने पीडित महिलेने कागदपत्रे परत मागितली तर ती कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या प्रकारचे कारणे देऊन, कागदपत्रे हिंगोली येथे असल्याचे सांगून पीडितेला कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने हिंगोली येथे आणले अन् एका घरामध्ये डांबून ठेवत तिच्या एक वर्षाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत, आम्ही सांगू त्या व्यक्तीसोबत तू लग्न कर, असा तगादा लावला होता.

मुलाला मारण्याच्या भीतीपोटी पीडिता आरोपी जसे सांगतील तसे करण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, पीडितेच्या वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार दिल्याने गोरेगाव पोलिसांनी मुलीचा शोध लावला अन् तिची कोणतीही कैफियत ऐकून न घेता तिला आई वडिलांच्या स्वाधीन केले. पीडिता स्वतः वर झालेला अन्याय सांगण्यासाठी पोलीस दरबारी सलग चार दिवसांपासून खेटे घेत होती. मात्र, गोरेगाव पोलीस ठाण्यात तिची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती.

दरम्यान, ठाणेहद्दीचे कारण पुढे करत तिला हिंगोली येथे तक्रार दाखल करून घेण्याचे लिखित कळविले होते. त्यामुळे पीडित महिलेने हिंगोली येथे धाव घेतली. मात्र तिथेही ठाणे हद्दीचे कारण पुढे केले अन् गुन्हा दाखल करून घेण्यास स्पष्ट नकारच मिळाला. शेवटी आठ दिवसाने उशिरा गुन्हा दाखल करून घेतला. मात्र, 24 तास उलटूनही स्वतः कार्यरत असलेल्या ठाण्यात ठाणेदारलाच गुन्हा दाखल झाल्याची साधी कल्पनादेखील नव्हती. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details