हिंगोली- औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव येथील एका शेतकऱ्यावर विहीर नसताना चक्क 4 हजार युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरण कंपनीने गुन्हा दाखल केला आहे. यावरून शेतकऱ्याला पोलीस कोठडीची हवाही खावी लागली आहे. तर न्यायालयानेही शेतकऱ्याला 71 हजाराचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे शासनाने आता ही विहीर शोधून द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर सोळंके (रा. येहळेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोळंके यांच्याकडे 1 हेक्टर बागायती शेती आहे. सोळंके यांच्या शेतात बोअर आणि विहीर नसल्यामुळे पिकांची जोपासना करण्यासाठी ते शेजाऱ्याकडून उसने पाणी घेऊन शेती करतात. दरम्यान, 29 सप्टेंबर 2018 ला वीज चोरी पकडण्यासाठी वीज वितरण विभागाचे अधिकाऱ्यांनी येहळेगाव आले होते. त्यावेळी त्यांनी परिसरातील 7 ते 8 जणांची वीज चोरी पकडली. तसेच सोळंके यांच्यावरही वीज चोरीचा आरोप केला. एवढेच नाही तर सोळंके यांच्यावर सेनगाव पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे विहिरीचे फोटोदेखील काढल्याचा उल्लेख पंचनाम्यात करण्यात आला आहे.
हेही वाचा -हिंगोलीतील 'या' गावात धगधगत्या निखाऱ्यावरून धावतात भक्त
दरम्यान, सोळंके यांना अटक करण्यासाठी पोलीस आले त्यावेळी सोळंके कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी सोळंके यांनी माझी विहीरच नाही, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांचे काही ऐकून घेतले नाही. पोलिसांनी सोळंके यांना वसमत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयानेही त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानहगी केली. त्यानंतर सोळंके हे जामीनावर सुटल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि औढा पोलीस ठाण्याला विहीर शोधून देण्याची विनंती केली आहे. दरम्यान, या शेतकऱ्याला 4 फेब्रुवारी 2019 ला अटक करण्यात आली तर 6 फेब्रुवारीला जामीनावर सुटका करण्यात आली. ही घटना 2019 मध्ये घडल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. गेल्या 8 दिवसांपूर्वी शेतकऱ्याला आरोपत्र मिळाले असल्यामुळे शेतकऱ्याने विहीर शोधून देण्याची मागणी केली आहे.
तर एवढ्यावरच न थांबत सोळंके हे मंत्रालयात धाव घेऊन, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांना देखील भेटून विहीर शोधून देण्याचे निवेदन देणार आहेत, असे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी सरकार दोषींवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - हिंगोलीत तूर काढताना मळणी यंत्रामध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू