हिंगोली -सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील काही शेतकऱ्यांनी पीकविमा आणि कर्जमाफीसाठी गावच विक्रीसाठी काढले आहे. याबाबत त्यांनी गाव विकत घेण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत पाठवले आहे. गावकऱ्यांच्या या अजब आंदोलनाने या गावाची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
आंदोलनाबाबत माहिती देताना नामदेव पतंगे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाचे सावट पसरले आहे, परिणामी शेतकऱ्यावर पुर्णतः उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षी तर भयंकर दुष्काळ पडला होता. अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या रकमा भरल्या होत्या. काहीचा पीक विमा मंजूर झाला. मात्र, काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. एवढेच नव्हे तर पीक विमा मिळण्यासाठी शासन दरबारी अनेकदा शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. मात्र, त्यालाही अपयश आले. यंदाही शेतकऱ्यांनी कशी तरी खरीपाची पेरणी केली. पण पावसाने दडी मारल्याने पिके पूर्णपणे हातची जाण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, तरी देखील राज्यसरकार शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे हे आंदोलन करत असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असून शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे जिल्हा केंद्रशासित घोषित करावा, तसेच बँकांच्या आडमुठ्या धोरणामुळे बऱ्याच शेतकऱ्याने विविध फायनान्सकडून कर्ज उचलून आपली घरे, शेती गहाण ठेवली आहेत, ती सोडवून देण्यांच्या मागणीकडे शासनाचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी आम्ही गाव विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर जोपर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत गावातील कोणतेही शासकीय कार्यालय सुरू ठेवले जाणार नाही. तसेच शाळेतही आमची मुले पाठवणार नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. एक तर आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी अजब मागणी देखील येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यापूर्वी याच गावातील नामदेव पतंगे या युवकाने कर्जामुळे शेतीची पेरणी देखील करणे अशक्य आहे, असे म्हणत आपले यकृत आणि मूत्रपिंड विक्रीस काढले होते. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली होती. शेवटी शिवसेनेने त्याचे कर्ज भरले आणि एका कंपनीने त्यांना पेरणी करुन दिली होती. आता त्याच पतंगे यांनी गावातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी गाव विक्रीस काढले आहे. आधी मूत्रपिंड आणि आता गाव विक्रीस काढल्याने पतंगे यांच्यासह ताकतोडा या गावाची जिल्हाभरात चर्चा होत आहे. आता सरकार हे गाव खरेदी करते की नाही, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, शरीरातील काही अवयव विकून सरकारला नमवता येते, हे पतंगे यांनी दाखवून दिले होते. त्यामुळे त्यांनी आज पासून आंदोलन सुरू केले आहे. तर ही स्टंटबाजी असल्याची चर्चा काही ग्रामस्थ दबक्या आवाजात करत आहेत. आता हे आंदोलन कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्व जण लक्ष देऊन आहेत. विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी गावांमध्ये धाव घेऊन ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या गावात दिसून येत आहे.