हिंगोली - महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या कर्जमाफीची घोषणा जाहीर केली आहे. हिंगोलीतल्या समगा या गावापासून कर्जमाफीचा शुभारंभ केला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याहस्ते 'आपले सरकार' केंद्रावर पहिल्या लाभार्थी शेतकऱ्याचा कर्जमाफीची पावती देऊन सन्मान केला. कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर दरम्यान, अवघ्या दोन तासात 70 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण केले आहे. आता येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक गावात कर्जमाफी आधार प्रमाणीकरण सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर, लाभ घेण्यासाठी जास्त कागदपत्रे आणण्याची गरज नसल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. कर्जाच्या डोंगरामुळे काही शेतकऱ्यांनी तर मृत्यूलाही कवटाळले आहे. मात्र, वारंवार घोषणांवर घोषणा केल्यानंतर आज प्रत्येक्षात कर्जमाफीचा लाभ देण्यात सुरुवात झाली आहे.
बालाजी कुरवडे या शेतकऱ्याला कर्जमाफीचा पहिला मान -
कर्जमुक्तीचा पहिला टप्पा हा हिंगोली जिल्ह्यातील समगा आणि खराबी गावापासून राबवला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी समगा येथे जात 'आपले सरकार' केंद्रांवर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण केले. तसेच यावेळी बालाजी कुरवडे या पहिल्या शेतकऱ्याला कर्जमाफीची पावती देऊन सन्मान केला. या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या समक्षच शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण केले.
केवळ दोन तासात 70 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी 'आपले सरकार केंद्र' तालुका समन्वयक गंगाधर लोंढे, केंद्रचालक रमेश सरकटे यांच्याही कामाचे कॊतूक केले. तर, 28 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक गावात कर्जमाफी आधार प्रमाणीकरण सुरू होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे अधिकारी व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हेही वाचा -
ठाकरे सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
सरकार पाडण्याची मर्यादा मी ११ दिवसांनी वाढवली, नारायण राणेंचे भाकीत