हिंगोली- सेनगाव तालुक्यातील ताकतोडा आणि हाताळा या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा, पीक कर्ज मिळावे या मागणीसाठी आपले गावच विक्रीसाठी काढले होते. ताकतोडा गाव विक्रीला काढून सातवा दिवस तर हाताळा या गावाला दुसरा दिवस उजाडला होता. दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी गाव खरेदीसाठी येणाऱ्याची खूप प्रतीक्षा केली. मात्र, कोणीही न आल्याने शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी विविध मार्गांनी आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची रीघ लागली होती. अनेकांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले होते. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी दुसऱ्याही दिवशी ताकतोडा गावाला भेट देऊन दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आज दोन्ही गावच्या शेतकऱ्यांने आंदोलन मागे घेतले.
ताकतोडा हे गाव विक्रीसाठी काढल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर या गावाची चर्चा रंगली होती. हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकांचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, तेथून ही अपयश आल्याने शेवटी शेतकऱ्यांनी खासगी फायनान्सकडून कर्ज उचलून आपली गरज भासवली. शेतकऱ्यांना पीक विमा देण्यामध्ये दुजाभाव करण्यात आला होता. त्यामुळेच परिस्थिती समोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी गाव विक्रीसाठी काढण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
शेतकऱ्यांच्या या अजब निर्णयामुळे महाराष्ट्र्रात चांगलीच खळबळ उडाली होती. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीपासून मात्र आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची रीघ लागली होती. काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रीसाठी काढलेल्या गावात ठाणच मांडले होते. मात्र, शेतकऱ्यांनी जेव्हा उपोषण सुरू केले तेव्हा प्रशासन खडबडून जागे झाले. अनेकदा प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु होते मात्र शेतकरी मागण्यांवर ठाम होते.
ताकतोडा पाठोपाठ हाताळा या गावाने देखील गाव विक्रीसाठी काढले. विविध संघटनांनी विक्रीसाठी काढलेल्या दोन्ही गावांना पाठींबा देण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने दोन्ही गावांना पाठींबा देत शनिवारी कनेरगाव नाका येथे अकोला - हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको करण्याचे निवेदन प्रशासनास दिले होते. मात्र, रास्तारोको करण्याच्या आदल्याच दिवशी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तर इतर मागण्यांची चौकशी केली जाईल असे सांगितले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आश्वासन दिल्याने सातव्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. प्रशासनाने अजून काही दिवस विलंब केला असता तर अजूनही अनेक गावे विक्रीस निघण्याची चिन्हे होती. मात्र, आता गाव विक्री काढल्यानंतर प्रशासन नमतेय हे स्पष्ट दिसून आलेय. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशा समस्या आहेत. त्यामुळे तेथील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी कर्ज माफ करण्यासाठी आपले गाव विक्रीसाठी काढावे की काय? असा सवाल केला आहे.