हिंगोली -शेतकऱ्यांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सावरत पेरणी केली आहे. मात्र पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली. यामुळे पुन्हा शेतकऱ्याला नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशातच विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे पिकाला पाणी पुरविणे शक्य होत नाही. मात्र पिकाला जगविण्यासाठी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने अस्सल जुगाडकरून आपल्या शेतातील पिकांना नव संजीवनी दिली आहे.
हिंगोली तालुक्यातील मालसेलू येथील शेतकरी नवनाथ गणेशराव देशमुख यांच्याकडे वीस ते पंचवीस एकर शेती आहे. ते शेतातील सर्वच कामे ट्रॅक्टरच्या साह्याने करतात. नांगरणीपासून ते पिकांना पाणी देणे व मळणी यंत्रातून पीक काढणीपर्यंत कुठेही बैल जोडीची गरज पडत नाही. हीच संधी साधून नवनाथ देशमुख यांनी ट्रॅक्टरवर इंजन जोडले. याच इंजनच्या साह्याने विद्युत प्रवाह तयार करून मोटारीला विद्युत प्रवाह दिला. या जुगाडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका तासाला मोठ्या शेती क्षेत्रात सिंचन पुरवठा करता येत आहे. यामुळे पिकाला जगविण्याच्या या जुगाडाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.