हिंगोली - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. कुशोबा भाऊराव इंगोले (५०, रा. कुरुंदा, वसमत), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हिंगोलीत कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या - हिंगोली शेतकरी आत्महत्या
हिंगोलीतील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कुशोबा इंगोले, असे मृत शेतकऱ्याचे नाव असून गेल्या ३ दिवसापासून ते बेपत्ता होते.
कुशोबा यांच्याकडे ३ एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. त्यांनी पेरणी व इतर कामासाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शिवाय त्यांच्यावर खासगी देखील कर्ज होते. शेतात कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन घेतले होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे डोक्यावर असलेला कर्जाचा बोजा कसा कमी करायचा? याच विवंचनेतून त्यांनी बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
गेल्या ३ दिवसांपासून ते घरातून निघून गेले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह जलेश्वर बंधाऱ्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपींनवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर इंगोले, जमादार बालाजी जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला. याप्रकरणी भाऊ विठ्ठल भाऊराव इंगोले यांच्या माहितीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.