हिंगोली- सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे फवारणी करताना शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारांच्या स्पर्शाने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. रामजी कांबळे (२७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चार दिवसांपूर्वीही एका तरुणाचा हळदीला पाणी देताना शॉक लागून मृत्यू झाला होता.
हिंगोलीत शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू; विद्युत वितरणचा भोंगळ कारभार - हिंगोलीत शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू
रामजी कांबळे (२७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कांबळे हे शेतात तूर व कपाशीची फवारणी करत होते. दरम्यान, शेतात पडलेल्या विजेच्या तारांना त्यांचा स्पर्श झाला आणि ते जोराने ओरडले व जागीच पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सेनगाव पोलीस ठाण्याला देताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. शेतामध्ये विद्युत तारा पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला.
विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकातून होत आहे. याच आठवड्यात सेनगाव परिसरात एका तरुणाचा पिकाला पाणी देताना शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यामुळे आता विद्युत वितरण कंपनी ही शेतामध्ये तुटून पडलेल्या तारांसंदर्भात किती गांभीर्याने घेते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.