हिंगोली - 'कसली कर्जमाफी अन कसलं काय, बँकेत कर्जमाफीचा शब्द जरी काढला तर बँकवाले म्हणतात, जा मग तिकडं सरकारला जाऊन विचारा कर्जमाफीचं काय झालं, आमचे डोके खाऊ नका,' असा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी संघटनेच्या धरणे आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, हे सरकार कर्जमाफी केली म्हणून शेतकऱ्यांना केवळ भूलथापा देत आहे. कर्जमाफी तर झालीच नाही वरुन बँक अधिकारी दुसरे कर्जही देण्यासाठी नकार देत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी दिली.
हे सरकार कर्जमाफी झाली असं घोकून-घोकून सांगत आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ही संबंधित गावांमध्ये वाटप करण्यात आल्या आहेत. मात्र, मुळात कर्जमाफी झालेली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना बँकेत उभे देखील राहू दिले जात नाही. कर्जमाफीचा विषय जरी काढला तरी बँक अधिकारी शेतकऱ्यांना धुडकावून लावतात, वरुन आम्ही तुम्हाला पाहून कर्जमाफी दिली, सरकारला पाहून नाही, असा जाब विचारतात, असा संतप्त खुलासा शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला.