हिंगोली- जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये केळीला पाहिजे, तेवढा भाव मिळत नसला, तरी मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना धीर मिळाला आहे. गिरगाव येथील केळी दिल्ली येथील बाजारपेठेत जात आहेत. त्यामुळे, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
यंदा कोरोनामुळे केळी विक्री होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत होती. दिल्ली, हैदराबाद यासह आदी परराज्यातील व्यवस्थापक परिसरातील शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करण्यापूर्वी पाहणी करून त्याला भाव देतात. मात्र, कोरोना परिस्थितीत असे होईल, याची शक्यता कमी होती. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, महामारीचा काळ असताना देखील केळीला मागणी आली. आज घडीला ९०० ते हजार रुपये प्रतिक्विंटल दराने केळीची विक्री केली जात आहे. वास्तविक पाहता खर्चाच्या तुलनेत ही किंमत अतिशय कमी आहे. मात्र, जागेवरच केळी सडण्यापेक्षा ती बाजारामध्ये विक्रीसाठी जात आहे, याचेच शेतकऱ्यांना समाधान वाटत आहे.