हिंगोली - रब्बीचा हंगाम सध्या जोरात सुरू असून विद्युत पुरवठा सुरू असेल तेव्हा शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. अशाच एका तरुणाचा शेताला पाणी देत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा -शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा.. व्यापारी अन् हमाल यांच्या बंद आंदोलनामुळे शेतमाल बाजारात पडून
माधव शेषराव फुपाटे (वय 17 रा. घोरदरी ता. सेनगाव) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. माधव आणि त्यांचे वडील हे शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेले होते. माधव वडिलांपासून काही अंतरावर जाऊन हळदीला पाणी देत होता, तर वडील त्याला बॅटरीचा प्रकाश देण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेवर माधवचा पाय पडला आणि तो जागीच कोसळला. ही बाब वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ माधवकडे धाव घेतली अन् हातातील लाकडाने त्याला बाजूला केले. हा प्रकार त्यांनी आपल्या घरच्यांना कळविली.
हेही वाचा -हिंगोलीत कारभार सुधारण्यासाठी रुग्णालयाला खासदारांनी दिला आठ दिवसांचा वेळ
नातेवाईकांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली आणि माधवला रिसोड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून माधवला मृत घोषित केले. शेतात विद्युत तार तुटून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. खरीप पूर्णपणे हातचा गेल्यामुळे निदान खरिपाची उणीव भरून काढण्यासाठी शेतकरी जीवाची जराही पर्वा न करता रब्बी पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच ही घटना घडली, त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्यावेळी पाणी देताना मोठी काळजी घेण्याची गरज असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. माधवच्या पश्चात पाच बहिणी, एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. माधवच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात माधवच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे.