हिंगोली- राज्यात 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन झालेले आहे. राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. अशावेळी शाळेत असलेले पोषण आहार कडधान्य शाळेतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे अधिकार शाळेच्या स्थानिक समितीकडे सोपवण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला असल्याचे सांगितले.
केंद्र आणि राज्य शासनाने 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन करण्याचे आदेश बजावले आहेत. यामुळे शाळेत देखील विद्यार्थी नाहीत. इयत्ता आठवीपर्यंत सर्व परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. अशावेळी शाळेमध्ये विद्यार्थी येत नसला तरी शाळेतील विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी राज्य शासनाने दिलेले शालेय पोषण आहाराचे धान्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्थानिक नियामक मंडळाच्या सल्ल्याने करावी. त्यामुळे शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणेला देखील माहिती द्यावी.
शाळेचा कोणताही विद्यार्थी उपाशी राहू नये, हा यामागचा उद्देश आहे. मात्र, यादरम्यान शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी जमू नये, याची काळजी घ्यावी. शक्यतो हा आहार विद्यार्थ्यांना घरपोच कसा पोहोचवता येईल, याबद्दल शाळा व्यवस्थापनाने विचार करावा. शालेय शिक्षण आहार शाळेत पडून न राहता गरजू विद्यार्थ्यांना देणे, हा यामागचा उद्देश असून शालेय प्रशासनाने यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे आदेश शालेय शिक्षण मंत्र्यांनी बजावले आहेत.
दरम्यान, राज्यात लॉक डाऊनमुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. अशा मजुरांना विविध सेवाभावी संस्थांकडून आणि प्रशासनाकडून मदत केली जात आहे. असे असताना या मजुरांची मुले देखील जिल्हा परिषद किंवा खासगी शाळेमध्ये जातात. या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येणारे शालेय पोषण आहाराचे कडधान्य शाळेत असताना हे विद्यार्थी उपाशी राहू नयेत, याची काळजी शालेय प्रशासनाने घेणे गरजेचे आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अध्यादेश देखील जारी केला आहे.