हिंगोली- जिल्ह्यात मागील काही दिवसापासून आत्महत्यांचे सत्र काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका जवानाच्या पत्नीने तर दुसऱ्या दिवशी एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोलीतील उच्चशिक्षित तरुणाचे स्पर्धा परिक्षेत अपयश, मानसिक तणावातून आत्महत्या - स्पर्धा परिक्षा
हिंगोलीत दिलीप बळीराम हरणे या उच्चशिक्षित तरूणाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दिलीप बळीराम हरणे (२६ रा. सावरखेडा ह. मु. सुराणा नगर, हिंगोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. दिलीप हा मागील दोन-तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यात त्याला दोन वेळा अपयश आले. त्यामुळे तो नेहमीच मानसिक तणावाखाली राहात होता. अशा परिस्थितीत त्याने नांदेड जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्गही लावले होते. मात्र, तो नेहमीच तणावग्रस्त अवस्थेत राहात होता. एवढेच नव्हे तर तो मागील काही दिवसापासून कोणाशीही काही न बोलत एकांतात राहणेच पसंत करत होता.
नातेवाईक त्याला बोलण्याचा खूप प्रयत्न करत होते. मात्र, त्याचे बोलणे कमी झाले होते. दरम्यान, त्याने अचानक राहत्या घरात आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविला. दरम्यान, याप्रकरणी अजून कोणतीही नोंद झालेली नाही.