हिंगोली - जिल्ह्यात दिवस-रात्र अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. अशीच एक घटना आज(रविवार) घडली असून एका ट्रॅक्टर चालकाला चोरून वाळू पळविणे चांगलेच जीवावर बेतले. घाई-घाईत ट्रॅक्टर पळवत असताना अचानक ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा ट्रॅक्टरच्या हेडखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना हिंगोली-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर घडली असून पवन रामचंद्र घोटेकर (27) असे मृत चालकाचे नाव आहे.
जिल्ह्यातील वाळू उपशावर शासन स्तरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तरी देखील वाहनधारक जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या नदीपात्रातून छूप्या मार्गाने वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी करत आहेत. यावर महसूल प्रशासन लक्ष ठेऊन आहे, तरीदेखील पथकाची नजर चुकवून वाहन चालक वाळूची चोरी करीत आहेत. जीवाची जराही पर्वा न करता वाळू चोरून सुसाट वाहने चालवत आहेत. त्यामुळे ही घटना देखील अशीच घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चालक हा वाळूचा ट्रॅक्टर सुसाटपणे घेऊन जात होता. हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील मसोड फाट्याजवळ त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले अन ट्रॅक्टर पलटी झाला.