हिंगोली- वसमत शहरातील बुधवार पेठ भागात रस्त्याने जाणाऱ्या एका सहा वर्षीय चिमुरड्यावर कुत्र्याने हल्ला करून त्याचे लचके तोडल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. चिमुरड्याने आरडा-ओरडा केल्याने नागरिकांनी धाव घेऊन त्या चिमुकल्याची सुटका केली.
हिंगोली जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील रस्त्यावर मोकाट कुत्री फिरत आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्यावर वसमत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुरड्या सोबतच एका महिलेवर देखील कुत्र्याने हल्ला केला आहे. यामध्ये महिला देखील जखमी झाली आहे. कुत्रे अचानक हल्ला करत असल्याचे पाहून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.