हिंगोली -सध्या शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे. त्याला धीर देऊन त्यांच्या अडचणी समजून घेत त्याला मदत कशी मिळेल यासाठी सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे. मात्र, हे या सरकारला जमत नसून, केवळ माईकवरच बोलणं एवढेच या सरकारला जमतंय, सर्वच मंत्री हे माईकसमोर बोलणारे आहेत. त्यांना शेतकऱ्यांचं काही देणेघेणे नाही, असा टोला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.
'शेतकऱ्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांनी समजून घेतला पाहिजे'
शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे. त्याला धीर देऊन त्यांच्या अडचणी समजून घेत त्याला मदत कशी मिळेल यासाठी सरकारने लक्ष घालणं गरजेचं असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते हिंगोलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.
हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाऊस होऊन दहा ते बारा दिवस उलटले असले तरीही अद्याप पर्यंत प्रशासन स्तरावर पंचनामे करण्यासाठी साधे कोणी फिरकले नसल्याची खंत शेतकरी फडणवीस यांच्यासमोर व्यक्त करत होते. त्यावर सरकारचेच याकडे लक्ष नसल्याचे सांगत मंत्र्यांना केवळ माईकवर बोलण्यात रस आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी व त्यांच्या जवळ येऊन त्यांना मदत करण्यासाठी अजिबात प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे शेतकरी हा खरोखरच हवालदिलं झाला असल्याचे फडणवीस म्हणाले.
रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीची पाहणी होत नसेल तर इतर भागांची काय व्यवस्था असेल यासाठी फडणवीस यांनी खंत व्यक्त केली. तसेच आता महिला व युवतींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. त्यामुळे गृहविभागानेही लक्ष देणे नितांत गरजेचं आहे. मात्र, तसे कुठंही होत नाही. कारवाई करण्याची गरज आहे, तेव्हा कुठे मन हेलावून टाकणाऱ्या घटना कमी होण्यास मदत होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.