हिंगोली - सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेतात असलेल्या तुराट्यांचा गंज पेटवून देत त्यात उडी घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले. बालाजी संभाजी डाखोरे (वय - 60) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
शेतकरी बालाजी डाखोरे हे शेतातच वास्तव्यास होते. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. मागील वर्षीच त्यांच्या मुलीचा आणि मुलाचा विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे डोक्यावर बँकेचे तीन लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच अशा परिस्थितीत सतत होणारा अवकाळी पाऊस यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यात यंदाही गारपीटीने शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आता डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे? याच विवंचनेत ते मागील दोन दिवसांपासून राहत होते. यामुळे शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांनी शेतात असलेल्या तुराठ्यांचा गंज पेटवून त्यावर थेट उडी घेतली. यात जाळाचा भडका जास्त असल्याने, दुसऱ्या शेतात असलेला भाऊ जवळ पळत येईपर्यंत शेतकरी बालाजी यांचा मृत्यू झाला होता.