हिंगोली : तालुक्यातील लोहगाव शिवारातील विहिरीत एका जवानाचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली येथे राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या एका जवानाचा हा मृतदेह आहे. मृतदेहावर ठिकठिकाणी जखमा असल्याने, ही हत्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
राजकुमार उत्तम पवार (वय ३५, रा. होलगिरा ता. सेनगाव) असे मृत जवानाचे नाव आहे. ते २००६ मध्ये हिंगोली येथील राज्य राखीव दलात भरती झाले होते. तर ते ई-कंपनीत कार्यरत होते. जांभरून तांडा येथून मंगळवारी रात्रीच्या सुमारास ते हिंगोलीकडे निघाले होते. मात्र, बराच वेळ होऊन देखील ते घरी न पोहोचल्याने, नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला होता.
विहिरीत आढळला मृत्यूदेह..
जवान पवार यांचा नातेवाईकांकडून शोध घेतला जात होता, मात्र ते कुठेही आढळले नाही. त्यांच्या फोनवरही संपर्क होत नव्हता. अखेर लोहगाव शिवारात असलेल्या एका विहिरीत त्यांचा मृत्यूदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. उदय खंडेराय, ग्रामीण पोलीस ठाण्याचे स.पो.नि. बळीराम बंदखडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनी शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार चव्हाण, रविकांत हरकाळ यांच्या पथकाने घटनास्थळी घाव घेतली.
पंधरा दिवसाच्या सुट्टीवर होते पवार..
पवार हे मागील पंधरा दिवसापासून अर्जित रजेवर गेल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे. तर मृतदेहावर जखमा असल्याने, ही हत्या असण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे. अद्याप याप्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही.