हिंगोली -वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्रातून पंजाबपर्यंत पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी शुक्रवारी आषाढी एकादशीनिमित्त गर्दी केली होती. संत नामदेवाचे दर्शन म्हणजेच विठुरायाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार, असे भाविक सांगत होते. काही महिला भाविकांनी तर वयाच्या पाचव्या वर्षी पासून नामदेवांच्या दर्शनासाठी येथे येत असल्याचे सांगितले. याठिकाणी काही शीख बांधव देखील पंजाब मधून दर्शनासाठी दाखल झाले होते.
हिंगोलीत आषाढी एकादशीनिमित्त संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळी भाविकांची गर्दी
संत नामदेवाचे जन्मस्थळ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेले नरसी गावात नामदेवाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली.
संत नामदेवाचे जन्मस्थळ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेले नरसी गावात संत नामदेवाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली. जे भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, असे भाविक आपल्या गावापासून चालत नामदेव मंदिरात दाखल झाले होते. काही भाविक तर वयाची पंच्याहत्तरी ओलांडली तरीही नित्यनेमाने नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी आषाढी आणि परत वारीला आवर्जून हजेरी लावतात. या दिवशी दिवसभरात लाखोच्या संख्येने भाविकांनी संत नामदेवाचे दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर पूर्णतः फुलून गेले होते. तर परिसरात दिवसभर सुरू असलेल्या रेलचेल मुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
मंदिर संस्थानच्या वतीने येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेता येईल, यासाठी व्यवस्था केली होती. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची अलोट गर्दी मंदिर परिसरात कायम होती. एवढेच नव्हे तर आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर योग्य औषध उपचार करुन त्यांना औषधे वाटप केली जात होती. बाहेरगावाहून पायी चालत आलेले भाविक भक्तांसाठी मंदिर संस्थानच्या वतीने फराळाची व्यवस्था केली होती तर काही भाविक घरातून आणलेल्या शिदोरीचा लाभ घेताना पहावयास मिळाले.