हिंगोली- जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतातील पिकांना अक्षरशः झोडपून काढले होते. बऱ्याच शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. सोयाबीन तर सडून गेले, मात्र आता पाण्यात उभी असलेली तुरही हातची जाण्याच्या मार्गावर आहे. अशातच सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी येथील एका शेतकऱ्याने पाच एकरातील तूर उपटून टाकली आहे. दर्शन गीते असे शेतकऱ्याचे नाव आहे.
...म्हणून शेतकऱ्याने उपटून टाकली ५ एकरातील तूर
जिल्ह्यात जवळपास ७०७ गावातील २ लाख १३ हजार ७२६ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन अन् कापसाचे नुकसान झाले आहे. तर, जिल्ह्यात ३ हजार १६ हेक्टरवरील तुरीचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मुसळधार पावसाने खरीप पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जवळपास ७०७ गावातील २ लाख १३ हजार ७२६ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन अन् कापसाचे नुकसान झाले आहे. प्रशासन स्तरांवर पंचनामे सुरू आहेत. मात्र, अजूनही बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असल्याने, मळणी यंत्रच सोयाबिनच्या गंजीपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. त्यातच साचलेल्या पाण्यामुळे तुरीचे अतोनात नुकसान होत आहे. जिल्ह्यात ३ हजार १६ हेक्टरवरील तुरीचे नुकसान झाले आहे.
या प्रकारामुळे हतबल झालेल्या गीते यांनी आपल्या पाच एकर शेतातील तूर उपटून टाकली. यांचा वापर ते गुरांचे खाद्य म्हणून करत आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे हाताशी आलेले पीक उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेली आहे. पंचनामे सुरू असले तरीही नुकसान भरपाई नेमकी पदरात पडेल कधी आणि डोक्यावरचा कर्जाचा डोंगर या नुकसान भरपाईतून कमी करायचा? की संसार चालवायचा? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.