महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे नुकसान - हिंगोली पाऊस बातमी

मुसळधार पावसामुळे खरीपाचे पीक हातचे गेले आहे. अगोदरच कोरोनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या निसर्गाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता फार वाढली आहे.

crop-get-wet-due-to-heavy-rain-in-hingoli
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सोयाबीन नुकसान

By

Published : Oct 11, 2020, 4:00 PM IST

हिंगोली-जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उरले सुरले खरीपाचे पीक मात्र हातचे गेले आहे. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार आहे. आज पहाटेपासून जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक कामांना ब्रेक लागला आहे.

सध्या खरिपातील मुख्य असलेल्या सोयाबीन पिकाची कापणी सुरू आहे. शेतकरी पावसाच्या भीतीने वाढीव मजुरी देऊन सोयाबीन कापणी करून घेत आहेत. अगोदरच पावसामुळे सोयाबीन हाताबाहेर गेलेले असताना ही कापणी होताच काही शेतकऱ्यांनी मळणी यंत्रातून हे सोयाबीन काढून घेण्यासाठी घाई केली, तर काही शेतकऱ्यांनी सुडी घालून, कापडाच्या सहाय्याने सुड्या झाकून ठेवल्या आहेत; मात्र ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन झाकून ठेवणे शक्य झाले नाही, अशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मात्र पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.

तसेच खरिपातील ज्वारी, कापूस आदी पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोनाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या निसर्गाच्या संकटाला ही सामोरे जावे लागत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता फार वाढली आहे. पावसाने भिजलेल्या सोयाबीनला दोन ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी त्रासलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details