हिंगोली- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांनी द्विशतकाचा आकडा पार केला आहे. सोमवारी रात्री आलेल्या अहवालात कळमनुरी येथील रुग्णालयात दाखल असलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्याची एकूण संख्या २०१ झाली आहे. तर सोमवारी वसमत अन हिंगोली येथील आयसोलेशल वार्ड मध्ये उपचार घेत असलेल्या पाच जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
एकीकडे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णसंख्येत भर पडत आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन जीव ओतून काम करताना पाहायला मिळत आहे. डॉक्टर दिवस-रात्र कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यात त्यांना यश देखील मिळत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाने द्विशतक पूर्ण केले असले तरीही आतापर्यंत एकाही कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. ही आनंदाची बाब आहे.