हिंगोली -शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले जवान रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तसेच ते परिचारीकांना उद्धटपणे बोलले असल्याचा प्रकारही समोर आला होता. त्यावरून शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी तातडीने राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशकांना पत्र लिहून जवानांची स्थिती सांगितली. त्यानंतर जवानांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. रुग्णालयात स्वच्छता नाही, तसेच कुठल्याही सोयी-सुविधा नसल्याचे त्यांनी सांगितले.
रुग्णालयात स्वच्छता नाही, पण आम्ही परिचारीकांना काही बोललो नाही; 'त्या' जवानांकडून आरोपाचे खंडन आम्ही जनतेची सेवा करणारे जवान आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत वाईट कसे वागणार? -
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मालेगाव आणि मुंबई येथून परतलेल्या 84 कोरोनाबधित जवानांवर उपचार सुरू आहेत. हे जवान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले होते. या बाबीची गंभीर दखल घेत शल्यचिकित्सक श्रीवास यांनी पत्र लिहून जवानांबाबत समादेशकांना तक्रार केली असता जवानांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आम्ही जनतेची सेवा करणारे जवान असून आम्ही कर्मचाऱ्यांसोबत वाईट कसे वागणार? विशेष म्हणजे आमच्यासाठी ते दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी आदरच असल्याचे जवानांनी सांगितले.
रुग्णालयात फक्त ३ शौचालय अन् बाथरूम, तेही अस्वच्छ -
ज्या ठिकाणी जवानांवर उपचार करण्यात येत आहेत, तेथे केवळ तीन शौचालय आणि तीन बाथरूम आहेत. ते वेळेवर स्वच्छ केले जात नाही, तर सॅनिटाईजची गोष्ट लांब आहे. तसेच त्याठिकाणी पाण्याच्या नावाने देखील बोंबाबोब आहे. अनेकदा सांगूनही पहाटे सात ते दहा या वेळेत पाणीच नसते. त्यामुळे शौचालयासाठी आमचे खूप हाल होत आहेत. हा प्रकार सुरू असल्यानेच सर्व प्रथम पॉझिटिव्ह आलेल्या 6 जवानांपैकी एकाचा देखील अहवाल हा 14 दिवसानंतर निगेटिव्ह आलेला नाही. मग याचे कारण काय समजायचे? उपचार तर सुरू आहेत. मात्र, सुविधा नसल्याने हे सर्व घडत असल्याचा आरोप जवानांनी केला आहे. तरी देखील आम्ही उपचारासाठी प्रतिसाद देत आहोत.
आमची प्रतिम मलीन करण्याचा प्रयत्न करू नका -
आम्ही कोणाला काहीही बोललो नाही. आमच्यासमोर त्या कर्मचाऱ्यांना घेऊन या आणि त्यांनी म्हटले आम्हाला अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेत बोलले, तर आमच्यावर कोणताही गुन्हा दाखल करा; त्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र, उगाच खोटे आरोप करू नका, असे जवान म्हणाले. आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करून नका. आम्ही काय मालेगाव आणि मुंबई येथे फिरायला गेलो होतो का? तिथे सेवा करायलाच गेलो होतो, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
व्हायरल व्हिडिओ पहिला म्हणून पत्र दिले -
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या गच्चीवर कोरोनाबाधित जवान फिरत असतानाचा व्हायरल व्हिडिओ पाहिला आणि परिचारीकांनी देखील तक्रार केली होती. त्यामुळे परिचारिका त्या वार्डमध्ये काम करण्यासाठी धजावत नव्हत्या. शिवाय त्यांचे मानसिक संतुलनही बिघडत होते. त्यामुळे तातडीने समदेशकांना हा प्रकार कळविणे गरजेचे होते, असे शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी सांगितले.
पहिले उपचाराला प्राधान्य देणे गरजेचे -
मालेगाव व मुंबई या हॉटस्पॉटवरून बंदोबस्त आटोपून परत आलेल्या जवानांची विलगीकरण कक्षात राहण्याची व्यवस्था केली. त्यांचे स्वॅब घेतले. मात्र, यामध्ये दुर्दैवाने हे जवान पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डमध्ये दाखल केले. त्याठिकाणी काय सुविधआ आहेत, हे पाहण्यापेक्षा उपचारा प्राधान्य देणे गरजेचे आहे. तसेच जे जवान रुग्णालयातील असुविधेचे फोटो पसरवीत आहेत, त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आता मात्र त्यांना उपचाराची गरज आहे. त्यानंतर आम्ही कारवाई करणार आहोत. तसेच जवानांना नियमितपणे त्यांचा आहार पोहोचिला जात असल्याचे समादेशक मंचक ईप्पर यांनी सांगितले. विशेष म्हणजे जिल्हा लहान असला तरी जवानांच्या उपचारासाठी व्हेंटीलेटरची व्यवस्था केलेली आहे. गरज वाटल्यास औरंगाबाद येथे एक खासगी रुग्णालयात ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जवानांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे समादेशक मंचक ईप्पर यांनी सांगितले.
क्वारंटाईन असलेल्या सहाय्यक समदेशकांनी दिली तक्रार -
विराट लोकमंचचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी जवानांच्या असुविधेबद्दल आवाज उठविला आहे. त्यामुळे हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठून राज्य राखीव पोलीस बलाच्या क्रमांक 12 चे सहाय्यक समादेशक रवींद्र जाधव यांनी पोलीस प्रशासनाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक पाहता जाधव हे स्वतः क्वारंटाईन असतानाही ठाण्यात आले कसे? त्यांच्यामुळे पोलीस प्रशासनातील कर्मचारी अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे शेख नईम शेख लाल म्हणाले. तसेच त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे जाधव यांची तक्रार केली आहे.