हिंगोली - देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, आजही अनेक गावातील स्मशानभूमीची अवस्था दयनीय आहे. सेनगाव तालुक्यातील पानकनेर गावातील स्मशानभूमीही अशाच स्थितीत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी मोठ्या यातना सोसाव्या लागतात. पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने जाता येत नाही. त्यामुळे इच्छा नसताना देखील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला अंत्यविधी उरकण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे. मात्र, अशी परिस्थिती असताना देखील लोकप्रतिनिधी अजिबात या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास तयार नाहीत.
गावाची लोकसंख्या १४ हजार आहे. गावातील मुख्य प्रश्न सार्वजनिक स्मशानभूमीचा आहे. गावापासून अंतरावर असलेल्या स्मशानभूमीची अवस्था भयंकर झाली आहे. मृतदेह घेऊन जाताना कधीही पाय घसरुन पडू शकतो याचा काही नेम नाही. या ठिकाणी असलेल्या ओढ्याला वाहत असलेल्या पाण्यामुळे तर अंत्यविधीसाठी आलेले कित्येक वयोवृद्ध पाय घसरून पडलेले आहेत. जवळपास ७३ वर्षे उलटलेत तरी देखील ही मुख्य असलेली समस्या अजिबात सोडविण्यात आलेली नाही. दिवसेंदिवस तर हा प्रश्न एवढा गंभीर होत चालला आहे.
हेही वाचा -प्रवीण दरेकरांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड ; 'असा' आहे त्यांचा राजकीय प्रवास