हिंगोली-कोरोनाच्या महामारीच्या काळात प्रत्येक जण स्वतःला झोकून देत कर्तव्य बजावत आहेत. मात्र, हिंगोली येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक शहरातील कोविड केअर सेंटर येथे नियुक्ती असताना गैरहजर राहिले. यामुळे त्यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सुजितकुमार जाधोर यांच्या फिर्यादीवरून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जिल्ह्यातील सर्वच नोडल अधिकाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
श्रीकांत मुंडे असे या नोडल अधिकार्याचे नाव आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. तर हिंगोली शहरात कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढायला सुरवात झाल्याने शहरात पाच दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेंटरवर नोडल अधिकारी म्हणून अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली आहे तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी यांनी सोपवली आहे. त्यानुसार हिंगोली येथील कोविड सेंटर येथे भूमी अभिलेख उपाधीक्षक श्रीकांत मुंडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु, मुंडे हे त्या त्याठिकाणी गैरहजर राहिले. त्यामुळे जिल्हा अधीक्षक जाधोर यांनी त्यांची चौकशी करून मुंडे यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्यांदाच एका नोडल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने, कोविड केअर सेंटर येथे नियुक्त केलेल्या सर्वच नोडल अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ज्या कोणी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या ठिकाणी मोजक्याच भेटी दिल्या होत्या, त्या भेटी वाढण्यास मदत झाली आहे. तर ग्रामीण भागातही नोडल अधिकारी हे आता धावून जात आहेत. त्यामुळे खरोखरच कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीमध्येही असे कामचुकार अधिकारी असल्याचे यावरून आढळून आले आहे.