महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाचलुचपत कार्यालय परिसरात निष्कारण फिरणाऱ्या भाजप तालुका प्रमुखासह तिघांवर गुन्हा - हिंगोली पोलीस न्यूज

शासनाच्या मालकीच्या इमारतीत जाणूनबुजून प्रवेश करून विनाकारण फिरल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध कलम 120 मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा लाचलुचपत कार्यालय हे पूर्णपणे सक्रिय असल्याचे दिसून आले आहे.

हिंगोली न्यूज
हिंगोली न्यूज

By

Published : May 29, 2020, 1:11 PM IST

हिंगोली - शहरातील लाचलुचपत कार्यालय परिसरात लॉबीमध्ये विनाकारण फिरणाऱ्या भाजप तालुकाप्रमुख यासह अन्य दोघांवर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक पाहता या तिघांची सर्वप्रथम चौकशी करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे.

संतोष ज्ञानबाराव टेकाळे, सखाराम अनाजी टेकाळे, किसन लक्ष्मण टेकाळे (सर्व रा. केसापूर ता. हिंगोली) अशी आरोपींची नावे आहेत. लाच-लुचपत कार्यालयात अधिकारी कर्मचारी काम करत असताना हे तिघेही जण लाचलुचपत कार्यालयाच्या लॉबीमध्ये फिरताना आढळून आले. त्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने त्यांच्या जवळ जाऊन तुमची काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. मात्र, ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे या तिघांनाही पोलीस उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासमोर उभे केले. मात्र, त्यांनाही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळेच हे तिघेही जण लाचलुचपत कार्यालय परिसरात विनाकारण फिरत असल्याची खात्री पोलीस उपाधीक्षक गायकवाड यांना झाली.

शासनाच्या मालकीच्या इमारतीत जाणूनबुजून प्रवेश करून विनाकारण फिरल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध कलम 120 मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा लाचलुचपत कार्यालय हे पूर्णपणे सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालय परिसरात विनाकारण फिरणे कसे महागात पडू शकते हेच या कारवाईतून समोर येतेय.

ABOUT THE AUTHOR

...view details