महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस; बीएसएनएल कंपनीचा टॉवर घरावर कोसळला - cyclone

हा टॉवर काढून घेण्याची मागणी नागरिकांच्या वतीने अनेकदा प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र, प्रशासनाने याची जराही दखल न घेतल्यामुळे शेवटी हा टॉवर घरावर कोसळला.

बीएसएनएल कंपनीचा टॉवर कोसळला

By

Published : Apr 17, 2019, 11:07 AM IST

हिंगोली- जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या वेळेस पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे ८ वाजता अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेत अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सेनगाव येथे जुन्या ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेला बीएसएनएलचा टॉवर अर्ध्यातून मोडून घरावर कोसळला. त्यामुळे गावात एकच आरडाओरडा सुरू झाला. जखमींना उपचारासाठी सेनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जिल्ह्यात मंगळवारी रात्री अचानक मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. प्रशासन मतदानाच्या तयारीला लागले आहे. घरावर कोसळलेला टॉवर अनेक वर्षापासून मोडकळीस आला होता. हा टॉवर काढून घेण्याची मागणी नागरिकांच्या वतीने अनेकदा प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र, प्रशासनाने याची जराही दखल न घेतल्यामुळे शेवटी हा टॉवर घरावर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही मनुष्यहानी झालेली नसली तरी, घरांचे व गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत घोंगडे यांच्या गोठ्यातील एक म्हैस दगावली. महसूल विभागाच्या वतीने पंचनामा सुरू आहे.

या घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. तर तहसीलदार जीवक कांबळे व महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा टॉवर अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेला असल्याने जराही वारा सुटला तरी आवाज येत होता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नेमके नुकसान किती झाले हे कळू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details