हिंगोली - आपल्या आजोबासह शेतावर वास्तव्यास राहणाऱ्या नातवाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी शिवारात ही घटना घडली. रात्री जेवण करून तो शेजारच्या शेतात गेला होता, सकाळी तो परत आला नाही. म्हणून त्याला पाहण्यासाठी गेलेली आई आणि अन्य एका महिलेला तो मृतावस्थेत आढळला. त्याला उठवण्याचा प्रयत्न करताना त्या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; दोन महिला गंभीर
अनेकदा शेतात नीट काळजी न घेतल्याने किंवा अनावधानाने अपघात होतात. अशीच एक घटना औंढा नागनाथ शिवारात घडली व एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
सुदाम बापूराव रिठ्ठे (वय-22) असे मृत मुलाचे नाव आहे. सुदामचे सर्व कुटुंब गेल्या 35 वर्षांपासून शेतातील घरात राहत होते. तो नियमित त्यांच्या शेतापासून जवळच असलेल्या दुसऱ्या शेतावर झोपण्यासाठी जात असे. काल नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून तो शेजारी गेला. मात्र, तो सकाळी परत न आल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला असता सुदाम हा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसला. त्याला हात लावून उठवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा धक्का लागला व त्या बाजूला फेकल्या गेल्या.
सुदामच्या आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून एक शेजारी महिला तिकडे धावली. तिने देखील सुदामला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, तिला देखील धक्का लागला. अद्याप या घटनेचा पंचनामा झालेला नाही.