हिंगोलीत पुन्हा रेशनचा काळाबाजार; पुरवठा विभागाने निलंबीत दुकानदाराला पाठवले धान्य
विविध तक्रारी अंतर्गत निलंबित केलेल्या रेशन दुकानदाराला शुक्रवारी रेशनचा पुरवठा करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात अजूनही काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे. दुकानासमोर राजीनामा दिल्याचे फलक लावलेले असतांना या दुकानात रेशनचा माल आल्याने, सर्वांनाच श्चर्याचा धक्का बसलेला आहे.
नरसी नामदेव येथील रेशन दुकान
हिंगोली- राज्यात हिंगोली जिल्हा रेशनचा काळाबाजार करण्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. याला पुरवठा विभागच जबाबदार असल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा समोर आले आहे. विविध तक्रारी अंतर्गत निलंबित केलेल्या रेशन दुकानदाराला शुक्रवारी रेशनचा पुरवठा करण्यात आला. यामुळे जिल्ह्यात अजूनही काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे. दुकानासमोर राजीनामा दिल्याचे फलक लावलेले असताना या दुकानात रेशनचा माल आल्याने, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील बाहेती या रेशन दुकानदाराला धान्य घोटाळा, वेळेवर धान्य वाटप न करणे, तसेच एकाच महिन्यात दोन महिन्याचे धान्य उचलून त्याचा अपहार करणे इत्यादी बाबींसाठी पुरवठा विभागाने चौकशीअंती निलंबीत केले होते. यानंतर या दुकानदाराने आपल्या दुकानासमोर राजीनामा दिला असल्याचे फलकही लावलेले आहे. मात्र, शुक्रवारी रेशनचा माल बाहेती यांच्या दुकानात उतरल्याने नरसी गावात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात तहसीलदार गजानन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, बाहेती यांनी रमेश परतानी यांच्या नावावर रेशन धान्य उचलले असल्याची माहीती त्यांनी दिली.
परतानी यांचा नरसी या गावाशी काहीही संबंध नाही. परतानी हे बाहेती यांचे भाचे आहेत, मात्र ते पंधरा वर्षापासून नांदेड या ठिकाणी स्थायिक आहेत. अशी माहीती ग्रामस्थांनी दिली आहे. या आधीही बाहेती यांनी दिगंबर गुगळे या मृत व्यक्तीच्या नावावर बनावट स्वाक्षरी करून माल उचलला होता. मृत व्यक्तीच्या नावावर माल उचलल्याने हा विषय तालुक्यात चांगलाच रंगला होता. ही बाब लक्षात येताच पुरवठा विभागाचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बाहेती यांच्या निलंबनाचे आदेश काढले. मात्र याकडे दुर्लक्ष करत तहसीलदारांनी बाहेती यांना रेशन माल पुरवठा केल्याचे समोर आले आहे. या सगळ्यामध्ये मात्र रेशनमालाचे लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासुन वंचीत आहेत.निदान आता तरी पुरवठा विभागाला जाग येऊन अपहार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.