हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटातच दगावले बाळ - पोटातील बाळ दगावले
हिंगोली येथे दोन दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी दाखल केलेल्या महिलेच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याने पोटातील बाळ दगावल्याची घटना घडली. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला आहे.
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या पोटातच दगावले बाळ
हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हलगर्जीपणा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याने पोटातील बाळ दगावल्याची घटना घडली आहे.
हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागातील परवीन शेख या महिलेला प्रसुती वेदना जाणवत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिला प्रसुती कळामुळे विव्हळत होती, तर महिलेचे नातेवाईक महिलेच्या प्रसुतीची प्रतीक्षा करत होते. मात्र बराच वेळ होऊनही डॉक्टरांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. तसेच अचानक संबधित महिलेला नांदेड येथे घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्यावेळी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती, त्यामुळे नातेवाईकांची धावपळ उडाली.
या सर्व गोंधळात महिलेच्या पोटातील बाळ दगावले. या प्रकरणावर रुग्णालय प्रशासन काहीच बोलायला तयार नाही. या रुग्णालयात प्रसूती मातांना तपासण्यासाठी नेहमीच हलगर्जीपणा केला जातो. याबाबत वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.