हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. सध्या राज्यात काही प्रमाणात टाळेबंदीतून सशर्त दिलासा दिला जात आहे. रिक्षा, वाहने फिजिकल अंतराच्या नियमानुसार सुरू करण्यात आली आहेत. रिक्षांमध्ये चालकाव्यतिरिक्त केवळ दोनच प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. याचा फटका रिक्षाउद्योगावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारिची वेळ आली आहे.
अनेकजण पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा या तीनचाकी वाहनाने आपल्या संसाराचा गाडा ओढत असतात. काहींकडे रिक्षा खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने अनेक जण भाड्याने रिक्षा घेतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. रिक्षा भाड्याने घेतल्याने रिक्षामालकांना पैसे द्यावे लागते. पण, सध्या हिंगोली जिल्ह्यातील 209 एवढा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत शिथिलता दिली आहे. प्रत्येकासाठी नियम घालून दिलेले आहेत. दुचाकीवरून एक तर तीन व चार चाकीतून फिजिकल अंतर ठेवत चालकाव्यतिरिक्त दोघेच प्रवास करू शकतील, असा नियम घालून दिला आहे.