हिंगोली -हट्टा येथे जागेच्या वादावरून शेजाऱ्यांनी घरात घुसून बीएसएफ जवानावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. जवानाच्या डोक्यात कुऱ्हाड आणि रॉड घालून त्यांना गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी आज हट्टा पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब खंडेराव खिस्ते (वय ३५) असे जखमी जवानाचे नाव आहे. या घटनेत जवानाचे आई-वडिल देखील जखमी झाले आहेत.
हिंगोलीत बीएसएफ जवानावर जीवघेणा हल्ला - crime
हट्टा येथे जागेच्या वादावरून शेजाऱ्यांनी घरात घुसून बीएसएफ जवानावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला.
शंकर डोळस, गजानन डोळस, दीपक डोळस, मीरा डोळस, गजाननची पत्नी, दिपकची पत्नी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीने जवान खिस्तेंच्या घरात घुसून त्यांना रिकाम्या प्लॅटच्या ठिकाणी तू टीनचे पत्रे का लावतोस ? असे म्हणत बेदम मारहाण केली. यामध्ये जवान बाळासाहेब यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मागील अनेक वर्षांपासून या जागेचा वाद सुरू आहे. आज हा वाद टोकाला जाऊन बाळासाहेब यांच्या घरात आरोपी शिरले, आणि त्यांना मारहाण करण्यात आली. बाळासाहेब यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास सुरू असून, पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही.